कोविड काळातील पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे योगदान

सध्याच्या कोविड-१९ च्या आलेल्या संकटामुळे औद्योगिक प्रगतीला खीळ बसली आहे. गतवर्षीलॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुण्यात चार हजारांच्या वर लहान आणि मोठे उद्योग परत सुरू झाले होते. तीन लाखांच्या वर कामगार पुन्हा कामावर रुजू झाले होते. परंतु करोना च्या दुसऱ्या लाटेनंतर या सर्वावर पुन्हा परिणाम झालेला आहे. त्यातून बाहेर पाडण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. प्रस्थापित उद्योग आणि नव्याने उभे राहिलेले उद्योग यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. उत्पादनापासूनते विक्रीपर्यंत सर्वच प्रणाली नव्या स्वरूपात तयार करणे, राबवणे आणि सतत बदलत राहणे हे एक आव्हान आहे. नव्याने उभ्या राहिलेल्या व्यावसायिकांना मानसिक धीर, खर्च कमी करण्यासाठीच्याउपाययोजना, विपणनातील नवे मार्ग, नव्याने निर्माण झालेल्या संधी यांविषयी तज्ज्ञांकडून सल्ला मिळणे गरजेचे आहे. परंतु सल्ला घेण्यासाठीही सध्या या व्यावसायिकांकडे पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे या व्यावसायिकांना एकत्र आणणे व यातून संधी व उपाययोजना निर्माण करणे याशिवाय तरुणोपाय नाही.

प्रस्थापित उद्योगांपुढे मनुष्यबळाचा योग्य वापर, कर्मचाऱ्यांचे मानसिक धैर्य टिकविणे, घरी राहून काम करताना कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि परस्पर संबंध यांचा समतोल राखणे, कर्मचारी कामावर येत असतील तर त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता अशी अनेक आव्हाने आहेत.

याचबरोबर औद्योगिक प्रगतीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी. महाविद्यालयीन विद्यार्थी जितके व्यवसायाभिमुख आणि कुशल होतील तितकी मनुष्यबळाची गरज चांगल्या प्रकारे भागली जाते. यासाठी उद्योगक्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यामध्ये दुवा सांधणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीमध्ये पुण्याचे योगदान खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. १९६० नंतर महाराष्ट्र सरकारने स्थापना केलेल्या उद्योगपूरक संस्था आणि योजना यांमुळेमुंबईमध्ये एकवटलेले उद्योग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पसरले. १९७० च्या दशकात पुण्यात यांत्रिकी उद्योग वाढीस लागले. त्यामुळे पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी याबरोबरच मुख्य औद्योगिक शहर अशी झाली. एखाद्या क्षेत्राचा औद्योगिक विकास होण्यासाठी ज्या विविध गोष्टींची आवश्यकता असते त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रातील मनुष्यबळ आणि सल्लागार.

याच काळात जगभर तंत्रज्ञानाबरोबरच उद्योग व्यवस्थापन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत होते. हा बदल येथील उद्योगांपर्यंत पोहोचणे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे होते. शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन क्षेत्रात पुण्यातील उद्योगांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने पुणे मॅनेजमेन्ट असोसिएशन ची २७ मे१९७७ रोजी कायदेशीर पूर्तता करुन स्थापना करण्यात आली. याचे संस्थापक होते पद्मभूषण कै. शंतनुराव किर्लोस्कर, कै. चंद्रकांत किर्लोस्कर, स्वस्तिक रबरचे कै. श्री. व्हीएस वैद्य, भारत फोर्जचे कै. डॉ. नीळकंठ कल्याणी आणिबँक ऑफ महाराष्ट्र चे कै. श्री. जोग. खरं तर या दिग्गज मंडळींनी १९६५ साली संस्थेची अनौपचारिक सुरुवात केली होती. पुण्याच्या बाजीराव रोडवर बँक ऑफ महाराष्ट्र च्या इमारतीमध्ये ही संस्था सुरु झाली आणि नंतर सध्याच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स च्या इमारतीमध्ये तिचे स्थलांतर झाले. संस्थेचे सर्व सोयींनी सुसज्ज असे सभागृह आहे.पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांना आणि व्यक्तींना या संस्थेने आर्थिक, गुणवत्ता, विपणन, विक्री, मनुष्यबळ विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. संस्थेच्या सुरुवातीपासूनच गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये थरमॅक्स च्या श्रीमती अनु आगा, भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, मॅनेजमेंट गुरु कै. शेजवलकर, एम आय टी चेश्री.विश्वनाथ कराड अशा अनेक मान्यवरांनी संस्थेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.डॉ एम व्ही पटवर्धन , श्री एस एच तळवळीकर, पी एम पारखे,डॉ दिलीप बोरावके, डॉ शेजवलकर, डॉ मंगेश कराड, डॉ गणेश नटराजन आदी मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

स्वयंरोजगार, रिअल इस्टेट, बांधकाम, अभियांत्रिकी उद्योग यांपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ या संस्थेमध्ये विनामोबदला कार्य करतात. गेल्या वर्षी संस्थेच्या रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले व त्यानुसार सध्या १४ Centre Of Excellence कार्यान्वित आहेत. प्रत्येक COE स्वतंत्रपणे परंतु संस्थेच्या ध्येयाला अनुसरून कार्य करते.

वर उल्लेखलेल्या नवीन व प्रस्थापित उद्योगांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत पुणे मॅनेजमेंट असोसिएशन मागील लॉकडाऊन पूर्वीपासूनच आणि नंतरही सतत कार्य करीत आहे. करोना पूर्वी संस्थेच्या सभागृहात होणारी ज्ञान सत्रे ऑनलाइन मार्गाने घेण्यासाठी त्वरेने सुरुवात करण्यात आली. त्यामुळे कोविडच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सुमारे २५० च्या वर मोफत ज्ञानसत्रेगुगल मीट च्या मार्गाने घेण्यात आली आहेत. संस्थेचे १४ COE मिळून ९०च्या वर कार्यकर्ते आहेत जे स्वतः उद्योजक, अनेक उच्च पदांवर काम केलेले आणि उच्चविद्याविभूषित आहेत. ही सर्व मंडळी समाजाला काही परत देण्याच्या उद्देशाने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. भारत सरकारने जाहीर केलेल्या कामगार कायदा सुधारणाविषयक तसेच शैक्षणिक धोरण विषयी अनेक तज्ञांना एकत्र आणून चर्चासत्रे घडवून आणण्यात आली. नवीन परिस्थितीमध्ये कोणती कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे हे ओळखून विविध क्षेत्रातील त्या-त्या कौशल्यं बाबत मार्गदर्शन पर अनेक व्याख्याने घेण्यात आली आणि ही शृंखला चालूच आहे. संस्थेची स्वतःची कार्य रचना आणि पद्धती ही Lean Agile या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेत स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विविध गटांना दिले जाते. अधिकारशाहीऐवजी ऐवजी नवीन कल्पनांना वाव, सर्वांनी मिळून निर्णय घेणे व ते राबवणे यावर भर दिला जातो. ही प्रणाली पुणे मॅनेजमेंट असोसिएशन मध्ये खूपच प्रभावी ठरली आहे. अधिकाराच्या वापरापेक्षा परस्पर सामंजस्यातून कामे सहज व चांगली होतात हे सिद्ध झाले आहे.

संस्थेची सदस्य संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि २७ मे २०२१ रोजी संस्थेला ४४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ४५ व्या वर्षात पदार्पण करताना संस्थेने कोविड-१९ या संकटा मधून उद्योगक्षेत्रालाव विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी योजना व मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळ पाटील तसेच उपाध्यक्ष श्री. प्रदीप तुपे यांच्या नेतृत्वाने आणि निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल याची खात्री वाटते.

प्रशांत दत्तात्रयपुंड
उपाध्यक्ष,
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन